मुंबई : राज्यात शनिवारपासून वळवाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या समुद्रावर ढगांनी दाटी करण्यास सुरुवात केली आहे. यंदा ६ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण भागात असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मान्सूनने मजल मारली आहे. तर बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनच्या शाखेने आणखी वाटचाल करत संपूर्ण अंदमान बेटसमूहांचा भाग व्यापला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) १८ मे रोजी अंदमानात दाखल झाले होते. त्यानुसार हवामान विभागाने दोन दिवसात पाऊस पडेल अशी घोषणा केली होती. या मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे येत्या तीन चार दिवसांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. येत्या ४८ तासात निकोबार बेटांवर पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, उद्या वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.